विजय पाटील
लातूर दि.१२:लातूर: शहरातील नामांकित देशिकेंद्र शाळेमधील गैरप्रकार, अपारदर्शक कारभार आणि व्यवस्थेतील भोंगळपणावर ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार विठ्ठल भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केल्याने संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराचे लक्तर वेशीवर टांगले गेले आहे.
देशिकेंद्र शाळेमधील बोगस भरती प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून आदिनाथ मुसळे यांचे नाव पुढे आले असून, ते दलाली करत शिक्षक पदाचे वेतन घेत असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. जर संस्थेला त्यांच्यावर इतका विश्वास असेल, तर त्यांचा पगार संस्थेनेच करावा, शासनाच्या निधीचा वापर करू नये, अशी मागणी जनतेतून होत आहे.
या प्रकरणात तक्रारदार नामदेव खुडे यांच्यावरही संशयाची सुई फिरली आहे. विविध शाळा व अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी करून नंतर त्यांच्यासोबत सेटलमेंट करून तक्रारी मागे घेणाऱ्या टोळीतील ते एक महत्त्वाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, खुडे यांचे पुत्र स्नेहल कुमार खुडे यांना 2016 पासून शाळेत नियुक्त केल्याचे दाखवून 2024पासूनच मान्यता देण्यात आली आहे – ही बाबच शिक्षण विभागातील गडबड उघड करते.
शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एका रात्रीत बोगस कागदपत्रांवर तात्काळ मान्यता आणि शालार्थ आयडी देणे, हे दबावामुळेच झाले काय, याची चौकशीची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही नातेवाईक लाभ घेत असल्याचे सूत्रांकडून समजते.
या गंभीर प्रकरणाची चौकशी सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सुरू आहे, मात्र ही चौकशी फक्त औपचारिकता असल्याचे चित्र आहे. ना संस्थाचालक, ना मुख्याध्यापक, ना कर्मचारी – चौकशीला कुणीही हजर राहत नसल्याने प्रशासनाचा ढिसाळपणा समोर येतो. शिवाय यामुळे यात उपसंचालकही सामिल आहेत असा संशय यायला वाव आहे .
या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा कलंक लागलेला असताना, ही लक्तरे उघडी पाडणाऱ्या भोसले यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर