हिमायतनगर (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ राबवले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत हिमायतनगर पोलिसांनी तालुक्यातील पोटा बु. येथे धाडसी कारवाई करत सुमारे ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा अवैध गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस दलाच्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय? हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील पोटा मस्जिदच्या बाजूला असलेल्या एका टीन पत्र्याच्या घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केली असल्याची गोपनीय माहिती हिमायतनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी २३ मार्च रोजी रात्री उशिरा सापळा रचला आणि शेख बाबा वालीसाब यांच्या मालकीच्या घरात छापेमारी केली.
लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी ‘गोवा १०००’, ‘वझीर केसरयुक्त’, ‘जीआय जर्दा’, ‘बाजीराव पान मसाला’ यांसारख्या विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू हस्तगत केली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ४ लाख ८८ हजार ३०० रुपये इतकी आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल याप्रकरणी आरोपी सैय्यद सत्तार सैय्यद खादर (वय ४८ वर्ष, रा. पोटा बु.) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ८२/२५, कलम १२३, २७४, २७५ (BNS) प्रमाणे बिट जमादार शामसुंदर नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड), उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कात्रे, बालाजी पाटील, सपना सूर्यवंशी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग नोंदवला.