नांदेड | महाराष्ट्र राज्यातील विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकाला असलेला तालुका हिमायतनगर आणि या तालुक्यात वसलेले मंगरूळ हे छोटसं गाव. गावाचा शेती प्रमुख व्यवसाय पण सिंचनाची सोय तुरळक. अठरा पगड जाती आणि सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेली लोकवस्ती. या गावातील एक तरुण जो आपल्या गावाच्या व सभोवतालच्या परिसरातील जनतेच्या मुलभूत गरजांसाठी मागच्या काही दशकांपासून निरंतर निस्वार्थपणे लढा देतोय. शिक्षण, रस्ते, आरोग्य, महिला सबलीकरण, अपंग कल्याण, शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न आणि दलित अत्याचार या विषयांवर शासनदरबारी जनतेचा आवाज बुलंद करत एक एक प्रश्न निकाली काढतोय.
कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध लढा, विद्यार्थ्यांना शासनाची बस मिळवून देणे, खैरगाव-मंगरूळ येथील पुल मंजुरीसाठीचा लढा, हिमायतनगर शहरात सामाजिक न्याय विभागाचे वस्तीगृह मंजुरीसाठीचा लढा, अल्पभूधारक शेतकर्यांना नवीन वीज जोडणी मिळावी यासाठी त्यांचा चालू असलेला संघर्ष या सर्व बाबींची दखल सामाजिक क्षेत्रात कार्यरत आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी घेतली आहे.या संस्था विविध क्षेत्रात निस्वार्थी पणे लढा देणाऱ्या व समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या लढवय्या व्यक्तींचा ” राज्यस्तरीय प्रेरणादीप पुरस्कार ” देऊन गौरव करतात. त्यांच्या मते ही माणसे समाजाला प्रेरणा देणारे दीप आहेत व त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या कामाला अधिक बळ मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार द्यायला सुरुवात त्यांनी केली.
तरी मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “राज्यस्तरीय प्रेरणादीप पुरस्कार-२०२५” साठी मंगरूळ येथील युवक संतोष लिंगोजी आंबेकर,लोकाभिमुख उपसरपंच, सोसायटी संचालक व जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड, अनुसूचित जाती विभाग यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या निवड समितीने सर्व निकषांवर मुल्यमापन करून ही निवड केली असल्याचे दोन्ही संस्थेचे अध्यक्ष, शंकरसिंह ठाकूर व मारोती शिकारे यांनी म्हटले आहे. सदरील आशयाचे निवडपत्र सुद्धा आंबेकर यांना पाठवण्यात आले असून दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवारी नांदेड येथील हाॅटेल ताज पाटील येथे पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती दिली.
या निवडीबद्दल संतोष आंबेकर यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले कि, मी सामाजिक क्षेत्रात जे काम करतोय ते अगदी निस्वार्थी पणे करतोय आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करतोय त्यामुळे चांगल्या कामाची दखल चांगली माणसे, चांगल्या संस्था घेत असतात, त्या वेळोवेळी चांगल्या कामासाठी मदत पण करत असतात. माझ्या कार्याला पुरस्कार देऊन सन्मानित करायला पाहिजे असं या संस्थांना वाटणे माझ्यासाठी खुपच प्रेरणादायी असुन माझी जबाबदारी अजून वाढवणारे आहे. त्याबद्दल निवड समिती व संस्थेचे अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर साहेब व मारोती शिकारे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो.













