विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.२३: कासारी बाजार सिटी चौक येथील स्वामी नारायण ज्वेलर्स लुटण्याचा मोठा कट दुकानमालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. दुकानात काम करणाऱ्या महिलेनेच ऑनलाइन ॲपद्वारे ओळख झालेल्या मित्रासोबत मिळून हा कट रचला होता. त्यासाठी दुकानात काम करणाऱ्या नोकराला हाताशी धरले. पण तो भलताच प्रामाणिक निघाल्याने सर्व कटाच्या टप्प्यांची माहिती दुकानमालकापर्यंत गेली… मग दुकानमालकाने सापळा रचूनच तिच्या मित्राला रंगेहात पकडले. सिटी चौक पोलिसांच्या ताब्यात संशयितांना देण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
राहुल निवृत्ती सकटे (वय ३७, रा. वसंतनगर दत्त मंदिराजवळ, ता. जि. सांगली, ह. मु. अमित हाईट्स झेड कॉर्नर, मांजरी, पुणे) व ममता अनिल उलेमाले (रा. बडाई गल्ली टिळकपथ, औरंगपुरा, छ. संभाजीनगर) अशी कट रचणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मधुबाला जिग्नेश चंद्राणी (वय ३८, रा. दिवाणी दिवडी पावण गणपती मंदिरामागे, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे स्वामी नारायण ज्वेलर्स हे कासारी बाजार सिटी चौक येथे सोन्याचे दुकान आहे. ते दीर व पती चालवतात. कधी कधी मधुबालाही दुकान सांभाळतात
दुकानावर कामाला अमोल मैड, ममता उलामाले, मयूर टेहरे, शुभम साळवे हे कामगार आहेत. दुकानावर कामाला असलेला मुलगा अमोल मैड याला त्याच्या व्हॉट्स ॲपवर २३ मार्च २०२५ रोजी मेसेज आला. तुला काही पैशांची गरज आहे. मी तुला मदत करू शकतो. दुकानात काम करणाऱ्या सगळ्यांकडे पैसे आहे. तुझ्याकडे पैसे नाही. तू जर मला दुकानातील दागिने काढून दिले तर मी तुला सुध्दा पैसे देईल. मी जसे सांगेल तसे कर…असे मेसेजमध्ये म्हटले हाेते. अमोल ही माहिती लगेचच मधुबाला आणि जिग्नेश यांना सांगितली. जिग्नेश यांनी अमोलला सांगितले, की तू त्या नंबरवरून येणाऱ्या मेसेजला सकारात्मक प्रतिसाद दे… त्यामुळे अमोलने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर काही दिवस मेसेज येणे बंद झाले. अमोलने सुध्दा स्वतःहून मेसेज केले नाहीत.
असा रचला सापळा…
सोमवारी (२१ एप्रिल २०२५) अमोलला व्हॉट्स ॲपवर त्याच संशयित नंबरवरून मेसेज आला. तू दुकानातील सोने हे एका बॅगमध्ये भर. तिजोरीतील सोनेसुध्दा टाक. लोकांचे गहाण ठेवलेले सोनेसुध्दा टाक. मी सांगेल तेव्हा सोने घेण्यासाठी येईल, असे मेसेजमध्ये म्हटले. अमोलने लगेच ही माहिती जिग्नेश आणि मधुबाला यांना सांगितली. जिग्नेश त्यावेळी अकोल्याला होते. दुकानात लुटीचा कट आखणाऱ्याला त्यांनी पोलिसांत पकडून देण्याचे ठरवले. आपण आधी त्या व्यक्तीला पकडून ठेवू व नंतर पोलिसांना कळवू, असे ठरविण्यात आले. जिग्नेश यांनी सांगितल्यानुसार, मधुबाला आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलांनी सापळा रचला. मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११ ला मधुबाला यांना अमोलचा कॉल आला. त्याने सांगितले, की त्या व्यक्तीचा पुन्हा मेसेज आला असून, त्याने तुझी तयारी झाली का, झाली असेल तर मी येतो, असे विचारले आहे. त्यावर मधुबाला यांच्या सांगण्यानुसार अमोलने त्याला हो म्हणून प्रतिसाद दिला. समोरच्या व्यक्तीने त्याला दुपारी अडीचनंतर येतो. तू तयारी करून
ठेव, असे सांगितले. त्यानंतर काही बनावट दागिने एका बॅगमध्ये भरून मधुबाला यांनी अमोलकडे दिले.
रंगेहात पकडला गेला…
समोरच्या व्यक्तीने परत मेसेज करत दुपारी ३ ची वेळ दिली. अमोलकडील बॅगमध्ये बनावट दागिन्यांत एक ग्रॅम सोन्याचे दोन कड्याचे जोड, चार बांगड्या, एक पाटल्याचा जोड, एक फॅन्सी मंगळसूत्र, चार वेगवेगळे लांब मंगळसूत्र देण्यात आले. ते घेऊन अमोल हा दुकानाजवळीलच मंदिराजवळ गेला. अंगात काळे जॅकेट, काळी पॅन्ट, डोक्यात काळे हेल्मेट व हिरो होंडा मोटारसायकल अशा वर्णनात तो येणार असल्याचे त्याने आधीच सांगितले होते. त्यानुसार त्याच वर्णनात तीनला तो व्यक्ती आला. अमोल त्याच्याकडे बनावट सोन्याची बॅग दिली. त्याने बॅग स्वीकारताच अमोल, शुभम, मयूर यांनी त्याला पकडून धरून ठेवले. जिग्नेश यांनी लगेचच पोलिसांना कॉल केला. तोपर्यंत त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव, गाव सांगितले.
पकडलेल्या राहुल सकटे याने सांगितले की, माझी व तुमच्या दुकानात काम करणारी ममता उलेमाले हिची ओळख ऑनलाईन ॲपद्वारे झाली होती. तिने तुमच्या दुकानात काम करणारा अमोल मैड याचा मोबाइल नंबर दिला होता. तिने सांगितले होते, की अमोल तुला मदत करणार आहे. त्याप्रमाणे मी अमोलसोबत बोलत होतो. त्याची कसून चौकशी सुरू असतानाच सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गायके. श्री. कदम आले. त्यांनी राहुल सकटेला ताब्यात घेतले. बनावट सोने, राहुलचा मोबाइल, मोटारसायकल जप्त केली. विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा जानेवारी २०२५ मध्ये जिग्नेश यांच्या दुकानासमोर कुणीतरी बंद लिफाफ्यात पत्र टाकून त्याद्वारे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करत आहेत
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!