Suspended PSI Ranjeet Kasle: बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ पोलीस सब-इन्स्पेक्टर (PSI) रणजीत कासले (Ranjeet Kasle) यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आज सकाळी अटक केली. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/जमाती (अॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) विश्वंभर गोल्ड यांच्याकडे आहे.
दरम्यान कासले यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी कोर्टाकडे कासलेंच्या 11 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून बीडच्या न्यायालयाने कासले यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान कासले यांच्या वतीने वकील शशिकांत सावंत यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील लोखंडे यांनी युक्तिवाद केला.
रणजीत कासले यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झाली होती. ते बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh)यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad)याच्या कथित एन्काऊंटर प्रकरणामुळे चर्चेत आले होते. कासले यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक दावा करत आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती असे म्हटले होते. त्यांच्या या दाव्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान गुरूवारी (17 एप्रिल 2025) कासले पुण्यात दाखल झाले होते. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक गंभीर आरोप केले. कासले यांनी सांगितले की, “ज्या दिवशी मतदान झाले, त्याच दिवशी माझ्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाले. मला EVM पासून दूर राहण्यासाठी ही रक्कम देण्यात आली होती. त्यांनी बँक स्टेटमेंट प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्याने त्यांच्या या दाव्यांना बळ मिळाले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे बीड पोलिसांवर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
वाल्मिक कराड एन्काऊंटरची ऑफर
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती असा दावा कासले यांनी केला आहे. “मला एन्काऊंटरबाबत विचारणा झाली, पुराव्याची मागणी करण्यात आली. एन्काऊंटरचा आदेश उघडपणे कोणी देत नाही. या सर्व चर्चा बंद दाराआड झाल्या,” असा दावा त्यांनी केला. त्यांच्यावर प्रशासकीय दबाव टाकण्यात आला आणि त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. याबाबत ठोस पुरावे सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कासलेंच्या या दाव्याने बीडच्या राजकीय आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कोर्टात काय घडलं? | आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कासले यांना अटक करून बीडच्या स्थानिक कोर्टात हजर केले. पोलिसांनी कासले यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी 11 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. यावेळी पोलिसांकडून युक्तिवाद करताना कासले यांच्यावर गंभीर आरोप असून तपासासाठी त्यांची सखोल चौकशी आवश्यक आहे. त्यांच्याकडे असलेले पुरावे आणि बँक व्यवहारांचा तपास करणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद करण्यात आला. तर कासलेंचे वकील शशिकांत सावंत यांनी कासले यांना अटक करण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर झाल्याचा दावा केला असा युक्तीवाद करत पोलिस कोठडीच्या मागणीला विरोध केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने कासले यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.