महिलांनी इशारा देताच हिमायतनगर पोलिसांची कारवाई
नांदेड दि.१७: गोरगरीबांचे संसार उध्वस्त करणारे सरसम येथील अवैध दारू विक्री अड्डे बंद करावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा येथील महिलांनी पोलिस प्रशासनास दिला होता. याची दखल घेत हिमायतनगर पोलिसांनी १७ रोजी नवी आबादीमधील दारू अड्डयावर धाड टाकली. या कारवाईत ३० हजार रूपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला.
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक गावात किराणा दुकान, पानटपरी व हॉटेलवर अवैधरित्या देशी- विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदा
करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लहान मुले, युवकांसह वृद्ध नागरिक दारूच्या आहारी जाऊन आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. यामुळे जागरूक महिलांनी एकत्र येत हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन अवैद्य दारू विक्री थांबवावी, अन्यथा आम्हाला धडक मोहीम उघडावी लागेल असा इशारा दिला होता. याची हिमायतनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाहीची मोहीम उघडली आहे.
पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ जून
रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम, इंदिरानगर आबादी येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. यात देशी दारू भिंगरी ११ हजार ६२० रुपये, मॅकडॉल ११ हजार २५० रुपये, आयबी ४ हजार ६२० रुपये, आरएस २ हजार ७०० रुपये असा एकूण ३० हजार १९० रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस जमादार अशोक सिंगणवाड, जमादार सुधाकर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या कारवाई नंतर अवैद्य दारू विक्रेत्याच्या खळबळ उडाली असून, भितीपोटी अनेकांनी गाशा गुंडाळला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिमायतनगर













